निदान देवळांचा परिसर तरी स्वच्छ असावा.
मोदींनी पंतप्रधान झाल्यावर पहिली घोषणा केली होती, 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत' घोषणा चांगलीच होती. पण तिची अंमलबजावणी करणे सरकारी यंत्रणेला किंवा जनतेला अजूनही जमत नाही. कारण आम्हा भारतीयांची पूर्वीपासूनची सवय आणि स्वच्छतेबद्दल असणारी अनास्था! स्वच्छता हा संस्कार आहे, तो असायला हवा. पण फारच थोडे लोक याकडे गांभीर्याने पाहताना दिसतात.
सर्वप्रथम स्वच्छता ही देशभरातल्या देवालयात असायला हवी. स्वच्छता म्हणजे पवित्रता. देवांचा वास असणारा परिसर अस्वच्छ असेल तर तेथे प्रसन्नता नांदणार नाही आणि पावित्र्यही असणार नाही. अर्थात अपवाद सगळीकडेच असतात. काही देवळे तर काही देवस्थाने स्वच्छही असतात, हेही तितकेच खरे. पण अपवाद फक्त नियम सिद्ध करतात. 99% देवळांमध्ये मात्र अस्वच्छता असते, उंचावर लटकणारी जळमटे दिसतात आणि भाविकांचा गडबड-गोंधळ चालू असतो.
माझ्या देवभक्त मित्राला (जयंत कुलकर्णी) अलीकडेच तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात जाण्याचा योग आला. तिथे त्याला स्वच्छतेचा अभाव जाणवला. त्याने सांगितलेला हा विदारक अनुभव...
देऊळ उंचावर म्हणजे डोंगरावर आहे. पण संपूर्ण आजूबाजूचा परिसर मात्र कचऱ्याने भरलेला आहे. खरे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत. यवनांनी हल्ले करूनही महाराजांनी ते सुरक्षित आणि व्यवस्थित सांभाळलेलं होतं. महाराजांची अपूर्व भक्ती आणि शक्ती असलेलं हे महाराष्ट्रातल्या शक्तीपीठांपैकी एक. पण *आज सामान्य भक्तांना शांतपणे दर्शनही दुर्मीळ झालंय. तेथील पोलीस मूर्तीसमोर थांबून साधा नमस्कारही करू देत नाहीत. ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध स्त्रिया कोणीही असो एक सेकंदात मानेत हात घालून ढकलून देतात.* (त्यांना देवीनं सद्बुद्धी द्यावी)
भक्तांनी घेतलेलं पूजेचं साहित्य (साडी, खण, नारळ, वगैरे ओटीचे साहित्य) देखील देवीला अर्पण करता येत नाही. त्यासाठी मंदिराच्या मागील बाजूस लक्ष्मी नारायणाचे एक छोटे देऊळ आहे. त्या ठिकाणी शर्ट-पँट घातलेला एक पुजारी(?) हे सगळे पूजेचे साहित्य घेऊन लक्ष्मी नारायणासमोर ठेवतो. ना मंत्र, ना पूजा. 'दुर्गे दुर्घट भारी' अशी एक उत्तर आरती म्हणतो. प्रसाद म्हणून एक नारळ-कुंकू देतो आणि पैसे घेऊन अदृश्य होतो.
*इथे दर्शनासाठी पैसे घेतले जात नाहीत, अशी घोषणा सतत स्पीकरवरून चालू असते. पण जलद दर्शनासाठी दोनशे रुपयांचं कूपन घ्यावं लागतं. अर्थात ही सक्ती नाही. पण मग फुकट दर्शनाला ५ ते ६ तास लागू शकतात.*
या दर्शनात भवानी आईसाठी भक्तांनी घेतलेलं ओटीचं साहित्य साडी देवीपर्यंत पोहोचतच नाही. ती लक्ष्मी-नारायणाच्या देवळात स्वीकारली जाते. देवी तुळजाभवानीची समाधानकारक भेट होतच नाही. शिवाय पुजाऱ्यांचे नातेवाईक देवळाच्या सर्व ठिकाणी ओटीचे साहित्य घेऊन बसलेले असतात. अगदी रांगेत उभे राहिलेल्यांनाही साडी घेण्याचा आग्रह केला जातो. भक्तांनी देवीला अर्पण केलेली साडीच पुन्हा विक्रीसाठी येते, असे तेथील एका दुकानदाराने गप्पांच्या ओघात सांगितलं.
देवीचे दर्शन भक्तांना शांतपणे आणि समाधानाने घेता येऊ नये, याचे मात्र नवल वाटते. *भोंगे महत्वाचे नाहीत. देवालयाची स्वच्छता आणि शिस्त महत्वाची.* त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या पार्श्वभूमीवर मशीद आणि चर्चमधील स्वच्छतेचे आणि शांततेचे उदाहरण अनुकरणीय ठरावे.
*हिंदुत्वाचे राजकारण करण्यापेक्षा हिंदूंची देवळे स्वच्छ व्हावीत आणि दर्शनात भक्तांना सुलभता मिळावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.* तुळजाभवानी आणि इतर मंदिरातील स्वच्छता ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी आणि भक्तांना मुक्त दर्शन मिळेल, यासाठीही देवळांच्या विश्वस्तांनी प्रयत्न करावेत. अन्यथा आपणच आपल्या धर्माला आणि भक्तांच्या भक्तीभावाला कमीपणा आणतो, असे म्हणणे उचित ठरेल.