Type Here to Get Search Results !

संतांचे विश्‍वात्मक विचार अन् वारीतून मिळते चैतन्य

0

 *संतांचे विश्‍वात्मक विचार अन् वारीतून मिळते चैतन्य*

🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩


"आई-वडिलांची सेवा हीच काशी"असल्याचे सांगत संतांनी श्रमात आणि सेवेत ईश्‍वर शोधण्याचा मार्ग दाखवला.योग,याग, जप, तप-विधी आदी कर्मकांडात अडकलेल्या सर्वसामान्य कष्टकर्‍यांची त्यातून सुटका करत नामस्मरणाचा मंत्र दिला. घरोघरी ज्ञानाची ज्योत पेटवत चमत्काराला मूठमाती दिली. हाच संताचा विश्‍वात्मक विचार माणसाला माणूस बनवतो. याची अनुभूती संत साहित्य वाचनातून आली. त्यामुळे पेशाने वैद्यकीय डॉक्टर असणारा मी कायमचा वारकरी झालो. गेली सत्तावीस वर्ष श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी पायी वारी करीत आहे. वारीत मिळणारा वैकुंठीचा आनंद घेत आहे. हेच स्वर्गीचे सुख *तुका म्हणे पावटणी।करु स्वर्गाची निशाणी।।* जीवनात चैतन्य आणणारा आहे.


पहिली-वहिली ६/७ वर्षे हार्मोनियम वादक,भजन गायक एवढ्या पुरतीच माझी मर्यादा होती.पुढील प्रवासात काल परत्वे प्रवचन,कीर्तन करण्याची संधी मिळत गेली. त्यातून व्यासंग दृढ होऊ लागल्यावर खर्‍या अर्थी संत साहित्याची ओळख होऊ लागली.संत विचांराची ओढ लागली.संतांच्या मौलिक तत्वज्ञानाची ओळख करुन घेण्यासाठी मन आतुरतेने वेडावले आणि वारकरी संतांच्या सहवासाला मन अक्षरशः लाचावले.


वारकरी सांप्रदायाचा एक अनुयायी म्हणून गेली ३२वर्षांहून अधिक काळ माझा जीवन प्रवास सुरू आहे.जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात १९९५ सालापासून अविरतपणे श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर पायी आषाढी वारी करीत आहे. पहिल्या वर्षी भंडारा डोंगर दिंडी समाज (दिंडी क्रमांक २१) या दिंडीत सहभागी होत पायी वारी केली.दुसर्‍याच वर्षी सातारा जिल्ह्यातील माउलींच्या पालखीसोबत जाणारी हनुमान दिंडी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी करून दिंडी क्रमांक ७० असा नोंदणी क्रमांक घेत वारीला सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत *जय हनुमान दिंडी क्रमांक ७०(रथाच्या पाठीमागे)* दरवर्षी आषाढी वारीत तुकोबारांयासोबत देहू-ते पंढरपूर प्रवास करीत आहे. या दिंडीसह अनेक दिंड्यांना तुकोबारायांच्या सोहळयात सामाविष्ट करणे साठी पुढाकार घेत जागोजागी मुक्काम, जेवणाची सोय केली. संत विचाराला अनुसरून समाजसेवा करत राहिलो. तुकोबारायांच्या वारीत सहभागी होणार्‍या वारकर्‍यांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले.वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई च्या माध्यमातून २००० सालापासून समाजकर्मी श्री.श्रीराम नलावडे (निगडी,पुणे)यांच्या मदतीने वारीत आरोग्य पथक सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला.आजही हे पथक कार्यरत आहे.स्वतःही जखमी व आजारी वारकर्‍यांवर उपचार करण्याचे व्रत निष्ठेने आजही चालू ठेवले आहे.

दरम्यान, संत विचार आत्मसात करू लागलो. तथागत गौतम बुद्धांच्या *"समता"-"बंधुता"- "स्वतंत्र्यता"* या त्रिसूत्राच्या आधारे समताधिष्ठीत समाज रचनेसाठी संतांनी जीवाचे रान केले होते.जीवघेण्या संघर्षांची पर्वा न करता वैचारिक नांगरणी केली होती.*महात्मा बस्वण्णा* कायक ते कैलास हाच धागा पकडून संत नामदेव, ज्ञानेश्‍वर, जनाबाई, सोयराबाई,चोखोबा आदी संतांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देत पांडुरंंग परमात्म्याला आपलंस केलं होत. वैदिक कर्मकांड, अंधश्रद्धा,अंधरुढी व क्लिष्ट परंपरा, सर्व प्रकारच शोषण, सामाजिक-आर्थिक विषमता, जातीयता, बुवाबाजी, भक्तीच्या आधारे चालू असलेला भ्रष्टाचार, स्वैराचार, भोंदूगिरी आदींचा खरपूस समाचार घेतला होता. तत्कालीन परीस्थितीशी दोन हात करत संतांनी केलेली समतापूरक विचारांची मांडणी,सर्व प्रकारच्या विषमतावादी व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी उभारलेली वैचारिक क्रांतीची चळवळ, मानवतेच्या मूल्यांची पेरणी अमूल्य असल्याचा प्रत्येय आला. संतांनी केलेला जीवघेणा संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे. यात स्वतःला झोकून देणे, सर्वस्व पणाला लावणे. तत्कालीन परीस्थितीचा विचार करता वरुन मजबूत पण अंतरंगाने किडक्या व सडक्या असलेल्या वैदिक परंपरेवर हल्ला चढवणे सोपे नव्हते. हे दिव्य कार्य संतांनी केले आहे.


वैद्यकीय शिक्षण घेत असताना आत्मसात केलेली गुणग्राहकता प्रत्येक ठिकाणी कामी येत होती. कोणतीही गोष्ट स्विकारण्याआधी तपासून पाहणे, त्याची चिकित्सा करणे,प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव तपासणे जणू सवयीचे झाले होते. संत विचारही त्याला अपवाद नव्हते. पूर्वीपासूनच वाचनाची आवड असल्याने जे हाती पडेल ते वाचून काढत असे. वाचन, चिंतन, मनन नित्याचे बनले होते.


जगद्गुरु संत तुकोबारायांचे चरित्र वाचू लागलो. यात संत तुकाराम महाराजांचे विचार आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत सांगितल्या जाणाऱ्या चमत्कारिक गोष्टी यात विसंगती दिसू लागली, जाणवू लागली तुकोबारायांच्या विषयीचे अनेक अवैज्ञानिक चमत्कार वाचनात आल्याने मन बेचैन व्हायचे. काही अपवाद वगळता बहुतांश चरित्रकारांनी संत तुकाराम महाराज यांच्या व्यक्तित्वाच्या छिन्न,छिन्न चिंधड्या केल्या होत्या. एक धगधगता निखारा थंडगार कोळसा कसा केलाय याची साक्ष पटू लागली. विपर्यस्तपणे माझ्या तुकोबारायांवर लेखन करीत इतर चरित्रांमध्ये त्यांची सामाजिक, कौटुंबिक, पारमार्थिक उंची कमी करण्याचा किती हिणकस प्रयत्न केलाय ते जाणवू लागले. प्रतिभासंपन्न संतांचे जीवन चरित्र मारून-मुस्कटून विचित्र चौकटीत बंदिस्त करण्याचा खटाटोप केला आहे याची साक्षच घेत होतो. या चरित्रलेखनात नक्कीच काहीतरी गडबड, घोटाळा आहे,सत्यता बेमालूमपणे लपवली जातेय असं वाटत राहायचे. मनातील ही खदखद अनेक जाणकार लोकांना बोलून दाखवायचो; पण समाधानकारक उत्तर मिळायचे नाही. खूप धडपड केल्यानंतर उत्तर मिळाले. 


जीवनात संत विचारांची वाट दाखविणारे माझे मार्गदर्शक (मी ज्यांना गुरु मानतो), नामवंत मुस्लिम कीर्तनकार *वै.ह.भ.प.अकबर आबा शेख, वै.ह.भ.प.रामदास महाराज जाधव (कैकाडी बाबा पंढरपूर) आणि वै. ह.भ.प निवृत्ती भाऊ भालेकर (तळवडे, देहू)* या तीन महान विभूतींनी मला *डॉ. आ. ह. साळुंखे* यांचे *"विद्रोही तुकाराम"* पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी काही मोजक्या प्रतिगामी वारकरी मंडळींनी विद्रोही तुकाराम पुस्तकाची होळी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्रोही तुकाराम पुस्तकाची प्रत मिळवण्यासाठी महत प्रयास करावा लागले.अखेर पुस्तक हाती लागले. बारकाईने,सूक्ष्म चिंतनाने ते वाचायला सुरुवात केली. वाचन एकेका प्रकरणावरून पुढे सरकत होते तस-तसे मला माझे खरे तुकोबाराय भेटत गेले अन् मी भरून पावलो. विद्रोही तुकाराम पुस्तक नाही तर!वस्तुस्थिती जन्य तुकोबारायांचे समग्र व यथार्थ दर्शन देणारा दिव्य ग्रंथच आहे अशी माझी श्रद्धा आहे.या ग्रंथात तुकोबारायांना खरा न्याय मिळालाय असं माझं मत आहे.मी पुन्हा-पुन्हा त्यातील प्रत्येक प्रकरण वाचत राहिलो,वाचत आहे, वाचत राहणार आहे. हे पुस्तक(ग्रंथ)वाचल्यापासून माझ्या पारमार्थिक प्रवासाची वाट बदलली आणि मी खर्‍या (पुरोगामीत्वाच्या) वाटेवर येऊन अध्यात्म स्वीकारू लागलो. तुकोबाराय जसे होते तसे अगदी धाडस करुन लोकांना पटवून देऊ लागलो, तुकोबारायांच्या *नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर॥* या वचनाची प्रेरणा मला प्रेरित करीत राहिली व पुढेही करीत राहील. 


मी तुकोबारायांच्या वैचारिक सहवासात दररोज असतो. त्यांच्या चरित्राचे विविध पैलू बारकाईने अभ्यासत असतो, त्यांच्याशी हितगुज करत असतो. संत तुकोबारायांनी *कपट काही एक।नेणो भुलवायाचे लोक॥* या नि:संदिग्ध व नि:स्वार्थी भावनेन केलेलं दिव्य असं समाजवादी कार्य शब्दात मांडता न येणारे आहे. अगदी थोडक्यात वर्णन करायचेच झाले तर त्यांनी पुकारलेला विद्रोह न भूतो न भविष्यती असाच होता.


*बुडता हे जन न देखवे डोळा।येतो कळवळा म्हणोनिया।।* असं म्हणत संत तुकाराम महाराज यांनी या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व संवर्धनासाठी केलेली प्रत्येक कृती आम्हाला पितृछत्राचीच पाखर घालणारी ठरते. जसा कुटुंब प्रमुख या नात्याने प्रत्येक बाप आपल्या कुटुंबाचे योग-क्षेम करण्यासाठी जीवाचं रान करतो, अगदी तसंच माझ्या तुकोबारायांनी या तमाम विशाल बहुजन समाजाची कुटुंब प्रमुख या नात्याने काळजी घेतली. त्यांना शहाणं-सुरतं करण्यासाठी अनेक रूपकं घेतली. वेळ प्रसंगी *अर्भकाचे साठी । पंते हाती धरली पाटी।।* या रुपात भाबडे-भोळे झाले. *लागोनिया पाया विनवितो तुम्हाला।* म्हणत नम्र झाले. *हुकूमदाज तुका। येथे कुणी फुंदो नका॥* म्हणत गर्भित इशारा देत होते. *किती सांगो तरी न ऐकती बटकीचे।पुढे सिंदळीचे...।।* अस म्हणत त्वेषाने शिव्यांची लाखोली वाहत होते. *हाकारूनी सांगे तुका।* म्हणत हाळी देत होते. *असाध्य ते साध्य करिती सायास। कारण अभ्यास तुका म्हणे॥* अशा वचनांनी स्फूर्तिदायक ठरायचे आणि ठरले. जबाबदार पालकाप्रमाणे ते समाज जागृतीचे काम करीत होते. एवढंच नव्हे तर या माझ्या सामाजिक परिवाराच्या व्यवस्थेमध्ये जर ईश्‍वराच्या नावाने प्रदूषण निर्माण करीत असतील तर तो देव सुद्धा त्यांनी नाकारला आणि *माझ्या लेखी देव मेला।* अस म्हणत ईशवराच्या विरोधात ही विद्रोह पुकारला.त्यालाही ठणकावले. *तुका म्हणे आम्ही विधीचे जनीते।* अस सुचित करीत मी त्याचाही बाप आहे, जन्मदाता आहे, हेही सांगायला विसरले नाहीत. असें अगणित पैलू माझ्या या बापात मला दिसले(लेख विस्ताराच्या भयास्तव अर्ध विराम देतो)आणि म्हणूनच *मी तुकोबांचा बच्चा आहे,* असे अभिमानाने सांगतो. माझा जैविक नसला तरी वैचारिक *बाप!* या नात्यानेच मी त्यांच्याकडे श्रद्धेन, निष्ठेनं पाहत असतो व पाहत राहीन.तेच माझ्या जीवनाचे सूत्र राहील,तोच ध्यास असेल,आणि तोच श्वास असेल.🙏🏻🙏🏻🙏🏻


- ह.भ.प. डॉ. सुहास लिलावती/नथुराम फडतरे, महाराज कुमठे (सातारा)

-----------------

वारी निमित्त नियोजित अंक प्रसिद्ध होत आहे त्यासाठी पाठविलेला हा लेख!🙏🏻🚩🙏🏻

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad