Type Here to Get Search Results !

gajanan maharaj status || अशी घेतली श्रीं नी शेगावी समाधी

0

 

(श्रीं ची दुर्मिळ आणि सत्य माहिती असलेला लेख.)

लेखक:-ॲड. शरद बळवंतराव ढोबळे

महाल, नागपूर. 


श्री संत गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी शेगांवी समाधी घेतली. समाधी घेण्याच्या २ वर्षा आधीच महाराजांनी आपल्या समाधीची जागा, आपले लाडके भक्त हरी पाटील यांना बोटाने दाखवून म्हटले होते. 'हरी इथै राहिन रे मी!' ज्या जागेचा महाराजांनी निर्देश केला होता ती गाढव मळ्यांची जागा होती व त्या ठिकाणी हरी पाटलांनी एक काळा दगड गाडून ठेवला होता. त्याच जागेवर आज महाराजांची समाधी आहे.



इ.स. १९१० च्या आषाढी एकादशीच्या यात्रेला श्री. हरी पाटील, बाळाभाऊ , बापूना काळे, जगू आबा आणि इतर भक्तांसोबत पंढरपूरला जाण्यास निघाले. गोमाजी महाराजांचे दर्शन घेऊन नागझरीवरुन आगगाडीने पंढरपुरात आले व कुकाजी पाटलाच्या वाड्यात श्री सोबत उतरले. आषाढी नवमी दिवस होता. 'जय जय रामकृष्ण हरी' भजनाने सर्व पंढरपूरचा परिसर दुमदुमून गेला होता. तुळशी फुलांचा व बुक्क्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. सर्व दिंड्या पंढरीरायासं प्रदक्षिणेच्या आनंदात तल्लीन झाल्या होत्या. अशा वातावरणात श्रीसोबत आलेले भक्तगण पांडूरंगाचे दर्शन घेऊन शेगावला श्रीसोबत परत आले. तेव्हा श्री आजारीच होते. श्रावण महिन्याच्या शेवटी श्रींची प्रकृती आणखीनच बिघडली. श्रींची प्रकृती जास्तच बिघडत आहे, हे माहीत होताच डॉ. कवर आठ दिवसांची रजा घेऊन शेगांवला आले व उपचार करु लागले. ५ सप्टेंबर १९१० ला श्रींच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. हे बघून डॉ. कंवर यांनी श्रींना वर्धेस जाण्याची परवानगी मागितली. श्रींनी ती दिली. डॉ. कवर इकड़े वर्धेस जाण्यास निघाले आणि तिकडे श्रींना पुन्हा ताप चढला. तो इतका वाढला की, ६ सप्टेंबरला श्री बेशुद्ध झाले. त्यानंतर संध्याकाळी श्री शुद्धीवर आले. श्री शुद्धीवर आले म्हणून सर्व भक्तांना आनंद झाला. दीड महिन्याच्या आजाराने श्रीं चे शरीर फार क्षीण झाले होते.


७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी होती. त्या दिवशी संध्याकाळच्या आरतीसाठी , हरी पाटील, बंकटलाल अग्रवाल, रामचंद्र कृष्णाजी पाटील, बापूना काळे, रामदेव सुखदेव मोदी आदी भाविक मंडळी जमली होती. आरतीला वेळ असल्यामुळे सर्व मंडळी श्रीसमोर जाऊन बसली. त्याच ठिकाणी बाळाभाऊ आले व अशृपूर्ण नयनांनी सर्वांना सांगू लागले की, काल रात्री मला जाग आली व मी जामकरांना जागे केले व म्हणालो की, श्री करुणामय आवाजात स्वगत काहीतरी बोलत आहेत ते आपण गुपचूप ऐकू. मग आम्ही दोघेही श्रींचे शब्द कान देऊन ऐकू लागलो. *श्री म्हणत होते.'हे पांडूरंगा विठ्ठला, माझे अवतार कार्य संपले, म्हणून हे दयाधना विठ्ठला मला जाण्याचा हुकूम द्या. माझी अशी इच्छा आहे की, भाद्रपद महिन्याच्या ऋषिपंचमीच्या दिवशी सुर्योदयानंतर वैकुंठधामी आपणाजवळ यावे. ' असे श्रींच्या समाधीसंबंधीचे बोलणे बाळाभाऊंनी हरी पाटील आणि उपस्थितांना सांगितले.* लगेच दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी होता. त्यामुळे श्री उद्या आपल्यातून जाणार म्हणून सर्व भक्त दुःखाने व्याकूळ झाले होते. हे बाळाभाऊंचे बोलणे ऐकून हरी पाटलांनी श्रींना विचारले की, बाळाभाऊ सांगतो आहे हे खरे आहे काय ? त्यावर श्री हरी पाटलास म्हणाले की, जेव्हा मी तुझ्यासोबत पंढरपूरला आलो होतो तेव्हापासून माझे मन व ध्यान पांडूरंगाच्या चरणी लीन झाले व मी पांडूरंगाशेजारी पंढरपूरलाच देह ठेवण्याचा निश्चय केला होता. परंतू पांडुरंगास हे रुचले नाही. म्हणून मी शेगांवला परत आलो. श्री सर्व भक्तांना म्हणाले, तुम्ही शेगांवास पुण्यक्षेत्र समजा. माझ्यावर पूर्वीसारख्याच श्रद्धेने' भाव ठेवा. तुम्हास काहीच कमी पडणार नाही. आता सर्वजण आरती करा. "दुःखद वातावरणात कशीतरी संध्याकाळची आरती आटोपली. मग सर्वांचे सात्वंन करीत श्री म्हणाले 'उद्या सकाळी मी निजधामी जात आहे म्हणून यत्किंचितही दुःख करु नका, मी येथेच आहे असे समजा. आता रात्र झाली आहे. सर्वजण आपापल्या घरी जा व उद्या सकाळी येथे या. 


  महाराजांच्या तोंडून वारंवार समाधीची भाषा ऐकून उपस्थित भक्त मंडळी दुःखाने व्याकूळ झाली होती. काही भक्त मंडळी समर्थांना साष्टांग नमस्कार करुन रात्री घरी परत गेली. तर बाळाभाऊ, नारायण माहराज, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, रामप्रसाद जामकर अशी ही पाच भक्तमंडळी गणेश चतुर्थीच्या रात्रीपासून तर षष्ठीच्या दिवशी, समाधी घेण्याच्या वेळेपर्यंत, श्रीजवळच बसून होती.


शेगांवचे गजानन महाराज उद्या सकाळी समाधी घेणार, ही वार्ता, शेगांव आणि आजूबाजूच्या खेड्यात वाऱ्यासारखी पसरली. डॉ. कवर, श्रीमंत दादासाहेब खापर्डे, गोपाळराव बुटीसारख्या भक्तांना तारा करून सांगण्यात आले. कोणी मोटारने, कोणी रेल्वेने तर कोणी बैलबंडीने, तर कोणी पायीच शेगावला पोहोचू लागले. रेल्वेत तर पाय ठेवण्यास जागा नव्हती. इंग्रजांनी लोकहितास्तव खामगांव ते शेगावं हा रेल्वेचा प्रवास विनातिकिट केला होता तसेच शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील शाळा, कॉलेज, दुकाने व सर्व व्यवहार बंद होते. त्या दिवशी कोणीही शेतकरी किंवा मजूर शेतात काम करण्यास गेला नव्हता. रात्रीपासूनच मंदीर परिसरात भक्ताची गर्दी वाढू लागली. पहाटे वाद्यांचा गजर सुरू झाला. श्रींनी सुचविलेल्या व हरी पाटलांनी दगड गाडून ठेवलेल्या जागी अगोदरच समाधीसाठी एक चौकोनी खड्डा तयार करण्यात आला होता. त्याच्या शेजारी जाड काळसर मिठाने भरलेल्या बैलगाड्या ठेवल्या होत्या व बाजूलाच रिकाम्या द्रोणाच्या थप्पा ठेवल्या होत्या. जेणेकरुन प्रत्येक भाविकास श्रींचे दर्शन घेताना एक द्रोण मीठ भरुन श्रींच्या समाधिस्थानी अर्पण करता येईल.


८ सप्टेंबर १९१० गुरुवार, ऋषिपंचमीचा दिवस उजाडला. जागा स्वच्छ करून धुवून काढण्यात आली. श्रीचे दर्शन सर्वांना व्हावे म्हणून श्रींना उच्चासनावर बसविण्यात आले. सकाळी ७ नंतर तर लोकांची गर्दी इतकी वाढली की, उंचासनावर विराजमान श्री अनेकांना गर्दीमुळे दिसेनासे झाले. श्रींच्या समाधीचे हे दृश्य पाहून मंदिराचा परिसर करुणामय झाला होता. आरती घेऊन आलेल्या स्त्रियांना गर्दीमुळे दुरूनच आरती करावी लागली.थोड्याच वेळात टाळ मृदूंगाचा ध्वनी आसमंतात घुमू लागला.


काही क्षण श्रींनी भक्तांकडे डोळे भरून पाहिले आणि मुखाने हरीनामाचा उच्चार करून श्री सच्चिदानंदी लीन झाले. मंदिर परीसरात आक्रोशाचा एकच कल्लोळ उठला. त्यावेळी सकाळचे आठ वाजले होते. शेगांवला पंढरपूर चे रूप आले होते. देवस्थान नोंदीनुसार एकूण ७४ भजन मंडळी शेगावी आली होती. जास्तीत जास्त भक्तांना श्रीं चे दर्शन घेता यावे म्हणून भक्तांनी श्रींना दुसऱ्या दिवशी षष्ठीस समाधी देण्याचा निर्णय घेतला व पंचमीच्या रात्री संपूर्ण शेगावातून श्रींची मिरवणूक काढण्याचे ठरले. मिरवणूकीसाठी एक उंच रथ फुलांनी सजविण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर स्त्रियांनी सडे व रांगोळ्या काढल्या होत्या. रस्त्यावर दिव्यांची रोशनाई करण्यात आली होती. श्रींचे कलेवर बैठया स्थितीत उंचावर ठेवण्यात आले. भजनी दिंड्यांच्या गजरात श्रींची मिरवणूक सुरू झाली. दीड लाखांच्या वर भक्त शोकग्रस्त अवस्थेत मिरवणुकीसोबत चालत होते.


पंचमीच्या रात्री सुरु झालेली श्रीची मिरवणूक षष्ठीच्या सकाळी मंदिर परिसरात पोहोचली. श्रींना रथातून उतरवून बंगईत बसवून भक्तांनी न्हाऊ घातले. त्यानंतर समाधीकरीता ज्या ठिकाणी चौरस खड्डा करण्यात आला होता त्या ठिकाणी श्रींचे कलेवर ठेवून रुद्राभिषेक करण्यात येऊन आरती करण्यात आली आणि प्रत्येक भाविकाला जवळून श्रीच्या दर्शनाची संधी देण्यात आली. त्यावेळी प्रत्येकजण बैलबडीतील एक द्रोण मीठ घेऊन श्रींच्या समाधीस्थानाच्या खाली जागेत अर्पण करून नमस्कार करून दुःखी अंतकरणाने जात होता. अशाप्रकारे श्रींचे समाधिस्थान मिठाने भरण्यात आले व श्री गजानन महराज की जय च्या गगनभेदी आवाजात श्रींच्या समाधिस्थानावर शिळा ठेवण्यात आली.


अशाप्रकारे श्री प्रभुरामचंद्रांच्या चरणी संजीवनी समाधी अवस्थेत लीन झाले. ज्यावेळी श्रींना समाधी देण्यात आली त्यावेळी लोकांचा जनसमुदाय अडीच लाखापर्यंत होता. तर त्या दिवशी जो भंडारा झाला त्यावेळी १७४ पोते गहू लागला होता. अशी शेगावं देवस्थानात नोंद आहे. रामचंद्र कृष्णाजी पाटलाचे नातू सांगत की, श्रींनी समाधी घेतल्यापासून दीड वर्षांनी हरी पाटलास श्रींच्या दर्शनाची अनावर इच्छा झाली ती इच्छा इतकी तीव्र होती की, त्यांनी समाधीवरील शिळा बाजूला करून श्रींचे दर्शन घेतलेच. समाधीच्या वेळी श्री जसे बसले होते तसेच हरी पाटलांना दिसले, कारण संजीवनी समाधीच होती ती!


*शरद बळवंतराव ढोबळे*

*श्री संत गजानन महाराज लीला स्थळे दर्शन यात्रा सत्संग मंडळ नागपूर

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad