Type Here to Get Search Results !

पंढरपूरला गेलो की सर्व शोध थांबतात. सर्व इच्छा पूर्ण होतात

0

 दिनांक : १३ / ०२ / २०२२. 

५२१. अभंग क्रमांक ४२५२.


जो या गेला पंढरपुरा l आणिक यात्रा न मनी तो ll१ll

सुलभ माय पंढरिराणा l पुरवी खुणा अंतरीच्या llधृll

जन्मांतरिंच्या पुण्यरासी l वारी त्यासी पंढरी ll२ll

बाहेर येतां प्राण फुटे l रडें दाटे गहिवरें  ll३ll

दधिमंगळभोजन सारा l म्हणती करा मुरडींव ll४ll

मागुता हा पाहों ठाव l पंढरिराव दर्शनें ll५ll

तुका म्हणे भूवैकुंठ l वाळुवंट भींवरा ll६ll

जो कोणी एकदा पंढरपूरला जाईल तो नंतर कोणत्याच तीर्थयात्रेला  जाणार नाही. पंढरीचा राणा ही फार सहजपणे प्रसन्न होणारी माय आहे, ती आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करते. जन्मोजन्मीच्या पुण्याच्या राशी ज्याच्याखाती जमा असतील त्याला पंढरीची वारी करण्याचं भाग्य लाभतं. पंढरपूरहून परत फिरताना पंढरपुरच्या बाहेर पडलं की प्राण फुटून जाण्याइतकं दु:ख होतं. रडं दाटून येतं. कंठ गहिवरतो. पंढरीतून निघताना दहीभाताचा काला सेवन करतात आणि मुरडीचे कानवले करा म्हणतात. कारण तसे केल्याने पुन्हा पंढरीच्या राण्याकडे मुरडून पहाता येईल. परत फिरताना पुन्हा पुन्हा मागे वळून पहातो. तुकाराम महाराज म्हणतात, “भिवरेचे वाळवंट हे भूवैकुंठच आहे. 

अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात, “जो या गेला पंढरपुरा l आणिक यात्रा न मनी तो ll” जो कोणी एकदा पंढरपूरला गेला, तो परत आणखी दुसऱ्या कोणत्याही यात्रेला जायचं मनातच आणणार नाही. पंढरपूर हे सर्व तीर्थांचं तीर्थ आहे ही भूमिका आपल्या सर्व संतांनी पुन्हा पुन्हा मांडली आहे. डॉ. शामसुंदर मिरजकर आपल्या “संत नामदेव : समाजशास्त्रीय अभ्यास” या शोध ग्रंथात सांगतात की नामदेवांनी भक्तिमार्गाचे प्रवर्तन केले. नामदेव पूर्वकालीन लोकरूढी असलेल्या विठ्ठलभक्त संप्रदायाला नामदेवांनी गौरव आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिले. संत तुकाराम महाराजही आपल्या एका अभंगात म्हणतात, 

“सिंपीयाचा पोर एक खेळीया तो नामा l त्याने विठ्ठल बसवंत केला रे ll

आपुल्या सवंगड्या शिकवून घाई l त्याने फड सततंर जागविला रे  

त्याकाळी सनातन्यांचा, वैदिकांचा भर वेदप्रामाण्य, शब्दप्रामाण्य यावर होता. वैदिक धर्म मनुस्मृतीवर आधारलेला होता. या धर्मात ब्राह्मण स्त्रियांसह सर्व स्त्रिया आणि ब्राह्मण पुरुष वगळता सर्व पुरुष हे शूद्र अथवा अतिशूद्र गणले गेले होते. या स्त्रीया आणि शूद्रांतिशूद्रांना कोणतेही अधिकार वर्णव्यवस्थेने, सनातनी वा वैदिक धर्माने दिले नव्हते. वैदिक धर्म कर्मकांडप्रधान होता. या धर्मात व्रतवैकल्यांचं फार स्तोम माजवलं होतं. या व्रतवैकल्यांचं अवास्तव स्तोम माजवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यातून पुरोहित वर्गाला होणारी कमाई ! कोणतेही शारीरिक कष्ट न करता उर्वरीतांच्या श्रमातून, घामातून निर्माण होणाऱ्या धनाचं देवाधर्माच्या नावावर शोषण करून पुरोहित वर्ग ऐश करत होता. स्वत:ला धर्मगुरु म्हणवणारा हा वर्ग प्रत्यक्षात, तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर धर्मठग होता. ठग जसे लोकांना आडरानात गाठून, फसवून लुटत तसेच हे धर्मठग ऐहिक जीवनात अपयशी, निराश लोकांना आध्यात्मिक वाटेवर गाठून, देवाधर्माच्या नावावर, स्वर्गाचं आमिष दाखवून आणि नरकाची भीती दाखवून ठगवत होते. लुटत होते. त्यांनी हजारो चमत्कारिक पुराणकथा प्रसवून, त्यांचा अज्ञानी लोकात प्रसार करून, त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन पिढ्यानपिढ्या शुद्रातिशुद्रांची फसवणूक केली. त्यांनी अनेक तीर्थस्थानांची निर्मिती गेली. तीर्थस्थानांचं महात्म्य रचलं. लोकांच्या मनात पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पूर्वजन्म-पुनर्जन्म, चौऱ्यांशीचा फेरा, मोक्ष-मुक्ती यांचं पाखंड असं ठसवलं की त्यामुळे हेच शूद्रातिशूद्र त्या पुरोहितांकडे स्वत: होऊन जात आणि स्वत:ला लुटून घेत.

आज सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. शिक्षणाचं प्रमाण खूप वाढलं आहे. तरीही हे लोक ब्राह्मणाकडे जाऊन स्वत:ला लुटून घेत आहेत. तर मग ज्यावेळी हा सर्व समाज ठार अज्ञानी होता तेंव्हा काय परिस्थिती असेल? या सर्व बहुजन समाजाला या धर्मठगांच्या पकडीतून सोडवण्याचं आव्हान संतशिरोमणी नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर यांच्या पुढे होतं. अज्ञानी समाज लहान बालकासारखा असतो. लहान मूल जसं हातात घेतलेली वस्तू, त्याच्यासाठी कितीही घातक असली तरी, सोडत नाही तसाच अज्ञानी समाज घातक रूढीपरंपरा, समज यांना घट्ट कवटाळून बसतो. लहान बालकाच्या हातातली धोकादायक वस्तू काढून घेण्यासाठी दांडगाई करता येत नाही, तर त्याला दुसरी एखादी वस्तू देऊन त्याचं लक्ष दुसरीकडे वळवावं लागतं. तसंच घातक रूढीपरंपरांना कवटाळून बसलेल्या समाजाला त्यापासून मुक्त करण्यासाठी वेगळा, सक्षम पर्याय द्यावा लागतो. संतशिरोमणी नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांनी असे पर्याय समाजाला दिले. ज्याला पर्याय द्यायचा त्याच्यापेक्षा पर्याय अधिक चांगला, अधिक आकर्षक आणि अधिक फायदेशीर असायला हवा. त्याकाळात जे प्रस्थापित देव होते त्यांच्यापेक्षा नवा देव भारी हवा. नामदेव महाराजांनी विठ्ठल दिला. आधीचे देव प्रसन्न करायला फार उपद्व्याप करावे लागत. नियमित पूजाअर्चा, होमहवन, यज्ञयाग, जपतप, तीर्थयात्रा, दानधर्म, व्रतवैकल्यं करावी लागत. थोडा नेम चुकला वा विधी करताना काही चुकलं तर देव अप्रसन्न होणार. म्हणजे वर मिळायच्या ऐवजी शाप मिळणार. विधी ब्राह्मणांनीच निर्माण केले. त्यामुळे ते कसे पार पाडायचे ते त्यांनाच माहिती असायचं. विधी ब्राह्मणाच्या हातूनच करायचे असतात असा दंडकच होता. दुसरा काही पर्यायच नव्हता. या धर्मठगांपासून दुबळ्या समाजाचं रक्षण करण्यासाठी नामदेव महाराजांनी विठ्ठल प्रस्थापित केला. हा विठ्ठल कसा आहे? याला प्रसन्न करायला कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही. त्याला पूजा नको, अर्चा नको. अभिषेक नको, अनुष्ठान नको. यज्ञ नको, याग नको. जप नको, तप नको. प्रसाद नको, नैवेद्य नको. तो साध्या पानाफुलाचीही अपेक्षा करत नाही. तो फक्त निरपेक्ष भक्तीचा भुकेला आहे. तो भक्ताची कठोर परीक्षा पाहणारा नाही, तर तो भक्तवेल्हाळ आहे. त्याला भक्ताची आवड आहे. त्याला मानापानाची अपेक्षा नाही. तो बोलवण्याची वाट पहात नाही. तोच होऊन भक्ताला भेटायला येतो. अनेक संतांनी विठ्ठलाचं इतकं मोहक रूप वर्णन केलं आहे की कोणीही त्यावर मोहून जावं. हा विठ्ठल पुंडलिकाच्या विरहाने व्याकुळ होऊन त्याला भेटायला त्याच्या घरी गेला. आईबापाच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही. एक विट त्याच्या दिशेने फेकली आणि म्हणाला माझ्या आईबापाची सेवा पूर्ण होईतो त्या विटेवर उभा रहा. आणि तो जगन्नियता दोन्ही हात कमरेवर ठेऊन त्या विटेवर मुकाट्याने उभा राहिला. पुंडलिकाची वाट पहात थांबला. माझ्याकडे लक्ष दिलं नाही असं म्हणून तो रुसला नाही. रागावला नाही. मग पुंडलिक म्हणाला, “तू आता याच विटेवर कायमचा उभा रहा.” आणि अठ्ठावीस युगांपासून पांडुरंग त्या विटेवर तसाच उभा आहे. हा देव भक्तांचा अंकित आहे. हा देव भक्तावर सत्ता गाजवत नाही तर या देवावर भक्तांची सत्ता चालते. हा देव बाल नामदेवांच्या हाताने जेवण करतो. तो अस्पृश्य लेख्ल्या जाणाऱ्या चोखोबांच्या घरी जाऊन दहीभात खातो. तो सावता महाराजांना निंदू-खुरपू लागतो. तो गोरोबांना चिखल तुडवू लागतो, मडकी घडवू लागतो. तो संत सजन कसायांना मांस तुळू लागतो. चोखोबांना मेलेली ढोरं ओढू लागतो. तो नरहरी महाराजांना दागिने घडवू-फुंकू लागतो. तो अनाथ जनाईला दळू लागतो, भांडी धुवू-पुसू लागतो, तिच्याबरोबर शेण्या वेचतो, तिला आंघोळीला पाणी आणून देतो, तिला न्हाऊमाखू लागतो. तिची वेणीफणी करतो. तुकाराम महाराज म्हणतात,

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव l कुलधर्म देव विठ्ठल माझा ll

विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू l उतरील पारू भवनदीचा ll  

विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता l विठ्ठल चुलता बहिणी बंधु ll

विठठल हे जन विठ्ठल माझें मन l सोयरा सज्जन विठ्ठल माझा ll

तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा l नश्वरित गावा जाईन त्याच्या ll

तुकाराम महाराजांचा विठ्ठल त्यांच्याशी सर्व नात्यांनी जोडलेला आहे. आई-बाप, बहीण-भाऊ, सखा-सोयरा सर्व काही विठ्ठल आहे. पुढच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, “सुलभ माय पंढरिराणा l पुरवी खुणा अंतरीच्या ll” हा पंढरीचा राणा, पांडुरंग, विठ्ठल ही प्रसन्न होण्यासाठी अतिशय सोपी माय आहे. खरं तर माय म्हटल्यावर दुसरं काही म्हणायची गरजच रहात नाही. कारण तुकाराम महाराजांनीच म्हटलं आहे, “लेकुराचे हित वाहे l माऊलीचे चित्त ll ऐसी कळवल्याची जाती l करी लाभेंविन प्रीती ll” कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करणारी माय असते. विठ्ठल माय आहे म्हटल्यावर तो सहजप्राप्त आहे हे ओघानेच येतं. माय असल्यावर ती आपल्या लेकराची काळजी न सांगता घेते. लेकराच्या गरजा ती स्वत: होवून पूर्ण करते. ती त्याची काळजी घेते. ती त्याला आपल्या दृष्टीआड होऊ देत नाही. आपल्या लेकराला केंव्हा काय हवं ते आईला न सांगता कळतं. तुकाराम महाराज म्हणतात, “सुलभ माय पंढरिराणा l पुरवी खुणा अंतरीच्या ll” यावर तुकाराम महाराज आणखी एक अभंग लिहितात, ते म्हणतात,

“माझी विठ्ठल माऊली l प्रेमपान्हा पान्हावली ll

कुर्वाळुनी लावी स्तनी l न वजे दुरीं जवळूनी ll

केली पूर्वी आळी l नव्हें निष्ठुर कोवळी ll

तुका म्हणे घास l मुखीं घाली ब्रह्मरस ll

माझ्या विठ्ठल माऊलीला प्रेमाचा पान्हा फुटलेला आहे. ती मला प्रेमाने जवळ घेते, कुरवाळते, छातीला लावते आणि स्तन्य पाजते. मला क्षणभरही आपल्यापासून दूर करत नाही. मी काही चूक केली तरी ती कठोर होत नाही इतकी की कोवळी म्हणजे प्रेमळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ती माझ्या मुखी घास घालते, मला ब्रह्मरस पाजते.” खरोखरच जर आपल्या सर्वांचा निर्माता जर परमेश्वर आहे तर तो आपली माय झाला. आपण त्याची लेकरे झालो. जगात कोण आपल्या मातेला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजाअर्चा करतो? तिला अभिषेक-अनुष्ठान करतो. तिचा जप करतो वा ती प्रसन्न व्हावी म्हणून तप करतो? मग देवाला, विठाई माऊलीला खुश करण्यासाठी हे सर्व कर्मकांड करायची काय गरज आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हा पंढरीचा राणा ही फार सुलभ माय आहे. हा विचार समजून घेतला तर आपली सर्व कर्मकांडातून आपोआप सुटका होते. 

या सर्व कर्मकांडाची गरज का नाही ते तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगातून सांगतात. ते विठ्ठलालाच प्रश्न विचारतात, 

“कासियाने पूजा तुझी करू केसिराजा l हा चि संदेह माझा फेडी आता ll

उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे l तेथे माझे काय वेचे देवा ll”

देवपूजेसाठी जे जे काही वापरलं जातं ते ते सर्व मुळात त्या देवानेच निर्माण केलेलं जर आहे तर त्यानेच निर्माण केलेल्या पाण्याने वा दह्या-दुधाने त्यालाच अभिषेक घालण्यात काय अर्थ आहे? त्यानेच निर्माण केलेली पाने-फुलं त्यालाच वाहण्यात काय अर्थ आहे. शंकराला बेलाची पाने, गणपतीला जास्वंदीची फुलं वगैरे कशासाठी? गंध, तांबोल, अक्षता त्यानेच निर्माण केलं आहे. धूप, दीपही त्यानेच निर्माण केलं आहे. मग हे वाहून मी त्याला माझं काय देतो? शेवटी तुकाराम महाराज सांगतात की, “तुका म्हणे मज अवघे तुझे नाम l धूप दीप रामकृष्णहरि ll” अर्थात तुकाराम महाराज संदेश देतात की विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची वा कर्मकांडाची गरज नाही. तुम्ही मुखाने फक्त त्याचं नाम घेतलं तरी ते पुरेसं आहे. 

ब्राह्मणांनी सांगितलं होतं, “दैवाधीनं जगत सर्वम् मंत्राधीनं च दैवतम् l ते मंत्र: ब्राह्मणो आधीन l ब्राह्मणो मम दैवतम् ll” सर्व जगात देवाच्या आधीन आहे. ते देव मंत्रांच्या आधीन आहेत. ते मंत्र ब्राह्मणांच्या आधीन आहेत. म्हणून ब्राह्मण हेच माझं दैवत आहे. देव प्रसन्न करायला मंत्र आवश्यक असतात. मंत्र म्हणतांना त्याचा उच्चार जरी चुकला तरी त्याचे उलट दुष्परिणाम होतात अशी या धर्मठगांनी भीती घातली होती. मंत्र संस्कृतमध्ये होते. संस्कृत शिकण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता. त्यामुळे देव प्रसन्न करायचा तर आधी ब्राह्मण प्रसन्न व्हायला हवा. आणि ब्राह्मण प्रसन्न होण्यासाठी त्याला तो मागेत ती आणि तो मागेल तितकी दक्षिणा देणं भाग होतं. यावर उपाय काय? एकीकडे तुकाराम महाराज त्यांच्या मंत्राने देव वश होतो या दाव्यालाच आव्हान देतात. तुकाराम महाराज प्रश्न विचारतात, “तयांचे स्वाधीन दैवते असती l तरी का मरती त्यांची पोरं ll” दुसरीकडे तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठल आपली माऊली आहे. विठ्ठल जर माउली असेल तर तिला साद घालायला संस्कृतच यायला हवं असं कुठे आहे? जे अजून बोलायलाही शिकलं नाही त्या आपल्या बाळाची भाषा माऊलीला कळते तर आपली सर्वसामान्यांची भाषा काय त्या विठ्ठल माऊलीला कळणार नाही? म्हणजे देव आणि भक्त यांच्यातला भाषेचा अडसर दूर झाला. यातुनाजून एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे भक्ताला देवाशी संवाद करण्यासाठी मधल्या दलाल धर्मठगांना जी दलाली द्यावी लागत होती ती बंद झाली. देव आणि भक्त यांच्यातले दलाल नाहीसे झाले. अर्थात त्यामुळे या दलालांचा रोजगार बुडाला. सामान्य बहुजन समाज त्यांच्या जाळ्यातून निसटून जायची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व संतांचा खूप छळ केला. ऐनकेन प्रकारे त्यांचं तोंड बंद करण्याचा, त्यांचं साहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

यातून सामान्य भक्तापुढे प्रश्न निर्माण झाला की मी देवाला कोणत्या शब्दात आळवू? कोणत्या रागात आळवू? कितीवेळा आळवू? त्याचंही उत्तर संतांनी देऊन टाकलं आहे की तुम्हाला सुचेल त्या शब्दात आळवा. कारण बाळाचे बोबडे बोलही आईला स्वर्गीय आनंद देतात. कोणत्या सुरात आळवू? तर जमेल त्या सुरात आळवा. तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात,

न ये जरी तुज मधुर उत्तर l दिधला सुस्वर नाही देवें ll

नाही त्याविन भुकेला ईश्वर l येईल तैसा बोल रामकृष्ण ll

देवापाशी मागें आवडीची भक्ती l विश्वासेंशी प्रीती भावबळे ll

तुका म्हणे मना सांगतो विचार l धरावा निर्धार दिसें दिस ll

प्रत्येकाला लता मंगेशकर वा भीमसेन जोशींसारखे आरोह अवरोह काढायला जमणार नाही. प्रत्येकाचा स्वर गोड वा मधुर असेलच असं नाही. पण त्याचा विचार करू नका. देव तुमच्या सुस्वराचा वा मधुर स्वराचा भुकेला नाही. तो स्वरापेक्षा निरपेक्ष भावाचा भुकेला आहे. त्याला शब्दाचीही गरज नाही. मुक्याने मनातल्या मनात केलेली प्रार्थनाही त्याला ऐकू येते. संत कबीर म्हणतात ना, 

“मस्जीद में मुल्ला बांग पुकारे, क्या साहब तेरा बहरा हैं l

                   चिंटी के पग घुंगर बाजे, सो भी साहब सुनता हैं ll”

संतांनी आपल्या सर्वच अडचणी दूर करून टाकल्या. आपल्या मनातली भीती घालवली. आपल्याला धीर दिला. हिंमत दिली. उमेद दिली. विश्वास दिला. ही हिंमत, हा विश्वास कायम टिकवायचा असेल तर काय करायचं तेही सांगितलं. इतर तीर्थक्षेत्री गेला तर तिथले धर्मठग तुम्हाला भुलवतील, पुन्हा आपल्या जाळ्यात पकडतील. म्हणून तुम्ही इतर कोणत्याही तीर्थक्षेत्री जाऊच नका.

पंढरपूर हे सर्व तीर्थांचं तीर्थ आहे. भक्त पुंडलिकामुळे तिथे विठ्ठल भगवानाचा अहोरात्र वास आहे. इतर तीर्थस्थानी पुण्य कमावण्यासाठी, पाप क्षालन करण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं. पण जो पंढरपुरात नुसता राहील तो आपोआप मुक्त होवून जातो. त्याला काही न करता मोक्ष मिळतो. धर्मठग सांगत होते की काशी, हरद्वार वगैरेला गेल्यावर गंगेत डुबकी मारली तर सर्व पाप धुवून निघतं. मोक्ष मिळतो. संत नामदेव महाराज सांगतात की गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या रोज चंद्रभागेत येऊन स्नान करून पवित्र होतात. चंद्रभागेची सर कोणालाच नाही. आणि विठ्ठलासारखं दुसरं दैवत नाही. संतशिरोमणी नामदेव महाराज सांगतात, 

“आमुचा विठ्ठल प्रचंड l इतर देवाचे न पाहू तोंड ll

एका विठ्ठलावाचुन l न करू आणिक भजन ll

आम्हां एकविध भाव l न म्हणू इतरा देव ll

नित्य करू हा अभ्यास l म्हणे नामा विष्णुदास ll”

  जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, “तुका म्हणे चित्ती l धरा रखुमाईचा पती ll” एकच देव भजा, सतराशे साठ देवांच्या मागे पळू नका. त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणजे संतांनी याला भजू की त्याला भजू की आणखी कोणाला भजू हा आपल्या मनातला गोंधळही नाहीसा केला. पण हे इतकंच नाही. सनातन वा वैदिक धर्मात मोक्षाचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरुषालाच होता. त्यालाच देव प्रसन्न होत होता. पण पंढरपूरला तसं काही नाही. “उच्चनीच काही नेणें भगवंत l तिष्ठे भाव भक्ती देखोनिया ll” विठ्ठल लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, उच्चवर्णीय-नीचवर्णीय, स्पृश्य-अस्पृश्य, स्त्री-पुरुष, बाल-थोर असला कोणताही भेद करत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, “या रे या रे लहान थोर l भलतें याती नारी नर ll” पंढरपूरला जायचं डोळा भरून विठ्ठलाला पहायचं. ह्रदयात साठवायचं. चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनात रंगायचं. प्रेमरसात भिजायचं. भक्तिरसात चिंब नहायचं.  स्वर्गातही मिळत नाही त्या काल्याचा आस्वाद घ्यायचा. एकमेकांना उराउरी भेटायचं. आणि मग परत माघारी फिरायचं. सासरी जाणाऱ्या कन्येसारखं परत, परत माघारी वळून पहायचं. मनात हुरहूर लागून राहिली आहे. पण जाणं तर भागच आहे. तुकाराम महाराज फार सुंदर शब्दात ही हुरहूर व्यक्त करतात. ते म्हणतात,

कन्या सासुऱ्यासी जाये l मागे वळोनिया पाहे ll

तैसे जाले माझे जीवा l कधी भेटसी केशवा ll”

    जो पंढरपूरला जातो त्यांची तिथून निघताना अशीच अवस्था होते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, “पंढरीचें बा भूत मोटें l आल्या गेल्या झडपी वाटे ll” हे पंढरीचं भूत इथे येणाऱ्या-जाणाऱ्याला झपाटून टाकतं. “तुका पंढरीला गेला l नाही पुन्हा जन्मा आला ll” पंढरीचं आणि विठ्ठ्लाच्म महात्म्य असं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे पंढरीच्या वारीचं सुख कोणाच्याही वाट्याला येत नाही. त्यासाठी गाठी अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. “जन्मांतरिंच्या पुण्यरासी l वारी त्यासी पंढरी ll” इतकं पुण्य गाठी असल्याने वारी घडली पण काय मिळालं? “बाहेर येतां प्राण फुटे l रडें दाटे गहिवरें  ll” तर प्राण फुटावा असं दु:ख आणि रडणं? मग काय उपयोग असं कोणी म्हणेल. पण या दु:खाचं कारण तिथे मिळालेलं अपार सुख आहे. इतकं सुख मिळालं आहे, इतकं सुख मिळालं आहे की आता त्याचा वियोग होणार म्हणून हे दु:ख आहे. अनेक संतांनी त्यामुळेच पंढरपूरला आपलं माहेर म्हटलं आहे. “माझे माहेर पंढरी l” ही सर्व संतांची समान भावना आहे. पंढरपुर सोडताना होणारं दु:ख हे माहेर सोडून सासरी जाणाऱ्या सासुरवाशिणीचं दु:ख आहे. माहेर सोडून जातांना, आई-बाप, बहीण-भाऊ, सखे-सोयरे, सर्वांना सोडून जाताना कितीही दु:ख झालं तरी त्यामुळे आता यापुढे माहेरी जायचंच नाही असं कोणती लेक म्हणेल? कोणताही वारकरी असं म्हणत नाही की पंढरपूर सोडताना अतिव दु:ख होतं, म्हणून परत पंढरपूरला जायचं नाही. उलट, “दिवाळीच्या मुळा आसावलेल्या लेकीसारखा” तो पुढच्या वारीची वाट पहातो.     

पुढच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, “दधिमंगळभोजन सारा l म्हणती करा मुरडींव ll” सासरी निघालेल्या लेकीला पाठवणीच्या पाटवड्या आणि मुरडीचे कानवले म्हणजे करंज्या खाऊ घातले जातात. मुरडीचे कानवले खाल्ले म्हणजे लेक पुन्हा लवकर माहेराला येते असा समज आहे. वारकरीही म्हणतात की आता दहीभाताचं मंगलमय भोजन करा आणि मुरडीचे कानवले करा. मुरडीचे कानवले खाल्ले तर आपण पुन्हा लवकर पंढरपूरला येऊ अशी आशा त्यांना वाटते. बाहेर निघालेल्या माणसाच्या हातावर दही देण्याची प्रथा आहे. तिच्या मागचा आशय हाच आहे. घर सोडताना चमचाभर दही खाल्लं म्हणजे ती व्यक्ती लवकर घरी परतते. परतताना  प्राण फुटण्याइतकं दु:ख होत असूनही वारकरी पुन्हा लवकर पंढरपूरला येण्याची आस बाळगतात यावरूनच त्यांना पंढरपूरला किती अवीट सुख लाभतं त्याची कल्पना करता येते. सासरी जाणारी लेक जशी वळून वळून पहाते तसे ते चालता चालता मागे वळून पहात असतात आणि पंढरीराव नजरेत साठवत असतात. पुन्हा पुन्हा त्याचं दर्शन घेत असतात. “मागुता हा पाहों ठाव l पंढरिराव दर्शनें ll” या शब्दात तुकाराम महाराज ही उलघाल व्यक्त करतात. 

     शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, “तुका म्हणे भूवैकुंठ l वाळुवंट भींवरा ll” हे भिवरेचं म्हणजे भीमेचं, चंद्रभागेचं वाळवंट म्हणजे भूवैकुंठच आहे. वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ म्हणजे स्वर्ग नाही. पण स्वर्गापेक्षा कमीही नाही. वैकुंठ म्हणजे जिथे भक्तवत्सल पांडुरंग रहातो ते ठिकाण. ते कुठे आहे ते कोणाला माहिती नाही. पण पुंडलिकाच्या शब्दाला मान देऊन विठ्ठल अठ्ठावीस युगे पंढरीतच विटेवर आहे. वैकुंठ हे जर विठ्ठलाचं निवासस्थान असेल तर त्याचा अर्थ तो जिथे असेल तेच वैकुंठ ! अठ्ठावीस युगापासून तो पंढरपुरातच आहे. म्हणून पंढरपूर हेच भूवैकुंठ आहे सर्व वारकरी संतांचा दावा आहे. दुसरा कोणताच देव या भूमीवर वास करत नाही. म्हणून पंढरीनाथ हाच सर्वश्रेष्ठ देव आणि पंढरपूर हेच सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. म्हणून जो कोणी एकदा पंढरपूरला जाईल तो परत दुसरीकडे कुठेही जाणार नाही असा तुकाराम महाराजांचा विश्वास आहे. पंढरपूर सोडून कुठेही जाऊ नका हा त्यांचा उपदेश आहे. विठ्ठल सोडून दुसरा कोणताही देव भजू नका हा तुकाराम महाराजांचा आदेशच आहे.      

आजही पंढरपुरच्या विठ्ठलाच्या मंदिरात वारकरी निरपेक्ष भावनेने जातात. ते विठ्ठलाला कोणताही नवस बोलत नाहीत. त्याच्याकडे काहीही मागत नाहीत. सनातनी बडव्यांनी तिथे मूर्तीपूजा, विठ्ठलाला दह्यादुधाचा अभिषेक, आंघोळ, रोज वेगळी आरास, रोज नवं वस्त्र वगैरे नाटकं सुरु केली असली तरी विठ्ठलाला त्याची काही मातब्बरी वाटत नाही. पंढरपूरला काशी, गया, हरद्वार यासारखे पापक्षालनाचे विधी केले जात नाहीत. तिथे नारायण नागबळी वगैरे सारखे विधी नाहीत. चटकन दर्शन या नावाखाली तिथे भ्रष्टाचार सुरु असला तरी इतर तीर्थक्षेत्री जशी लुटमार चालते तशी पंढरपुरात नाही. वारकरी तिथे जातात. तासनतास रांगेत उभे राहतात. नामदेवांच्या पायरीचं दर्शन घेतात. चोखोबांच्या समाधीचं दर्शन घेतात, गरुड खांबाचं दर्शन घेतात, विठ्ठ्लाचं रूप डोळ्यात साठवतात आणि माघारी निघतात. ज्यांना हे शक्य नाही ते दुरूनच कळसाचं दर्शन घेतात आणि घरी परततात. कसलीच औपचारिकता नाही. दर्शन घ्यायला थांबला नाही म्हणून विठ्ठलही रुसत नाही. पंढरपुरापुढे स्वर्ग, वैकुंठ, कैलास सर्व फिके पडतात. आयुष्यातून एकदा जरी पंढरपूरला गेलं तरी जन्म-मरणाचा फेरा कायमचा चुकतो, मोक्ष मिळतो असं पंढरपूरचं महात्म्य सांगितलं जातं. म्हणूनच जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, “जो या गेला पंढरपुरा l आणिक यात्रा न मनी तो ll” पंढरपूरला गेलो की सर्व शोध थांबतात. सर्व इच्छा पूर्ण होतात.        


जय जगद्गुरू !



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad