😞
*हा बदल नक्की केव्हा झाला ?*
वीस पंचवीस वर्षांपूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता.. ! मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली जायची आणि मुलाला येण्याजाण्याच्या तिकीटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील कचरतात. मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत/इच्छा आई-वडिलांकडे नसते.
*हा बदल नक्की केव्हा झाला....?*
कॉलेजमध्ये जाताना साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्टमध्ये फिरताना बघते. मनातल्या मनात चरफडते पण स्पष्टपणे मुलीला अंगभर कपडे घाल असे म्हणायची हिंमत करत नाही....!
*हा बदल नक्की केव्हा झाला....?*
वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणं मागवते.
*हा बदल नक्की केव्हा झाला......?*
लग्ना अगोदर मुला-मुलीने एक-दोन वेळा भेटणे म्हणजे पुढारलेपण मानणारे आता नातवंडांचे लिव इन रिलेशनशिप स्वीकारतात.
*हा बदल नक्की केव्हा झाला.....?*
वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता प्रौढ झालेली माणसं घरातल्या तरुण मुलापुढे सहज ग्लास भरु लागली.
*हा बदल नक्की केव्हा झाला....?*
नातवंडांना जवळ घेणारी, नातीच्या केसांना तेल लावून देणारी, गोष्टी सांगणारी आजी, आता सकाळी योगा क्लास नाहीतर लाफ्टर क्लासला जाते आणि नातवंडांशी टीव्हीच्या रिमोटसाठी भांडते.
*हा बदल नक्की केव्हा झाला.....?*
घरातल्या कोणाशी बोलत नाहीत अशांना कौन्सिलर जवळचा वाटतो. त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मानतात. पण स्वतःच्या भावंडांवर विश्वास ठेवायला तयार नसतात. तोच प्रकार पैशाच्या व्यवहाराबद्दल. नवरा-बायको दोघेही कमावतात. पण कुठे खर्च झाले, किती गुंतवले, कुठे गुंतवले, ते फक्त सीएला माहित असते. मुलीच्या संसारातले सगळे लहानसहान तपशील जाणून घेणारे आई-वडील, मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात.
*असं का होतंय.....?*
*हा बदल नक्की केव्हा झाला.....?*
वडीलधा-यांचा मान ठेवणा-यांच्या मुली नवऱ्याचा येता-जाता अपमान करतात, सगळ्यांसमोर उणं-दुणं काढतात. अशा वेळी मुलीचे आई-वडील कसनुसं हसतात आणि मुलाचे आई-वडील हतबुद्ध होतात.
*हा बदल नक्की कधी झाला.......?*
तरुण मुले एक नोकरी सोडतात, दुसरी धरतात. राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आई-वडिलांना फक्त सांगितलं जातं. त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तर आई-वडिलांना सांगण्याचीही गरज नसते. मित्रांबरोबर ट्रीपला जाणे, ब्रेकअप होणे, सिनेमाला जाणे, पार्टी करणे, स्वतःसाठी नवीन वस्तू, फोन, कपडे वगैरे खरेदी करणे, अशा गोष्टीत आई-वडिलांनी दखल दिलेली मुलांना आवडतं नाही. असं का होतं..?
*हा बदल नक्की केव्हा झाला.......?*
नातेवाईकांकडे जाणं, शेजार्यांकडे वेळप्रसंगी जाणं, लग्न समारंभात सहभागी होणं, कुळाचार पाळणे, देवळात जाणे, पूजा करणे, इत्यादी गोष्टींवर आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात. असं का होतं...?
*हा बदल नक्की केव्हा झाला.......?*
मान्य आहे, दोन पिढ्यांमध्ये अंतर असतेच. पाचवारी नेसणाऱ्या सुनेबद्दल नऊवारी नेसणाऱ्या सासूने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. पण आता पन्नाशी पार केलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही दरी निर्माण झाली असं वाटतं.
*हा बदल नक्की केव्हा झाला......?*
खरंच विचार करायला हवा. समाज प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे चालल्याचे हे भयंकर वास्तव आहे. आणि ते सहजासहजी पचनी पडणारेही नाही हे मोठे *दुर्दैव* आहे !
विचार करायला लावणारा हा लेख माझ्याकडे आला. तुम्ही बघा बरं वाचून, तुम्हाला उत्तर सापडतेय कां.
काही घरांत अपवाद असतीलही त्यांना त्यांच्या दृढ परंपरेला सलाम.🙏🏻